♦️ भोर – महाड रस्ता (वरंधा घाट) वाहतुकीस बंद..
▲ भोर,पुणे दि. २७ – पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातून महाडकडे जाणारा राज्य मार्ग क्रमांक 15 हा २६ जून ते दिनांक ३१ ऑगस्ट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून याबाबत सुहास दिवसे जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, पुणे यांचे मार्फत नवीन अधिसूचना काढण्यात आली आहे.
याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे मार्फत मिळालेली अधिक माहिती अशी की पंढरपुर-भोर-महाड राष्ट्रीय महामार्ग क्र. 965 डी.डी. हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील रस्ता असून वाघजाई मंदिर या ठिकाणी दि. 19/06/2024 रोजी झालेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे दरड कोसळून रस्ता खचला गेला आहे. त्यामुळे सदर ठिकाणी रस्ता वाहतुकीसाठी अत्यंत अरुंद व धोकादायक झालेला आहे.
त्यानुषंगाने दि. 22/06/2024 रोजी भोरचे उपविभागीय दंडाधिकारी, निवासी नायब तहसिलदार, पोलीस निरीक्षक, उपअभियंता सा. बांधकाम विभाग इत्यादींनी वरंधा घाटाची संयुक्त पाहणी केली असता घाट भागामध्ये वाघजाई मंदिराजवळ मागील आठवड्यात झालेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे दरड कोसळून रस्ता खचलेला दिसून आला आहे. तसेच, सदर ठिकाणचा रस्ता हा अतिशय अरुंद स्वरुपाचा असून एका बाजूस प्रचंड उंचीचा धोकादायक कडा असल्याने त्यावरुन अचानकपणे डोंगरावरील दगड / दरड खाली येण्याची शक्यता आहे.
तसेच दुसऱ्या बाजूस तीव्र उताराची दरी असलेने सदर भाग सार्वजनिक वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक बनलेचे दिसून येत आहे. याबाबत हा रस्ता तातडीने दुरुस्ती होणे आवश्यक असलेने. सदर घाटामध्ये यापुर्वी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने दरड कोसळने, झाडे पडणे, रस्ता खचणे, माती वाहून जाणे अशा स्वरुपाच्या घटना घडल्याने जिवीत व वित्त हानी होण्याच्या घटना घडलेल्या आहेत. सद्यस्थितीत भोर तालुक्याच्या दुर्गम भागात सुरु असलेल्या पावसाची परिस्थिती पाहता, या भागातील डोंगररांगांमधून वाहणाऱ्या पाण्यासोबतच दरड, डोंगरावरील झाडे महामार्गावर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
म्हणून वरंधा घाटातून प्रवास करणाऱ्या तसेच मालाची ने आण करणाऱ्या व्यक्तीच्यां सुरक्षिततेच्या दृष्टीने सदरचा भोर हद्दीतील भोर – महाड वरंधा घाट हा रस्ता पुढील दोन महिने बंद ठेवण्याचा निर्णय घेणेत आला आहे. सदर अधिसूचना लागू केलेनंतर काही विधीग्राह्य मुद्दा उपस्थित झाल्यास त्याअनुषंगाने सुधारित अधिसूचना काढण्यात येईल. दिनांक २६ जून पासून ते दिनांक ३१ ऑगस्ट पर्यंत महाडकडे जाणारी सर्व वाहतूक तूर्तास पूर्णतः बंद करण्यात आली आहे.
बातमी व जाहिरातींसाठी संपर्क – किरण मोरे 9011555123