▲शिरवळ दि. २२ – शिरवळ शहर परिसरात भुरट्या चोरीचे व आठवडी बाजारात मोबाइल चोरट्याचे प्रमाण वाढले आहे. पोलिसांनी बाजारात पेट्रोलिंग करुनही चोरटे हाती लागत नसल्याचे दिसून येत आहे.
शुक्रवारी (दि.२१) शिरवळचा आठवडी बाजार हा महाशिवरात्रीनिमित्त कन्याशाळा ते केदारेश्वर मंदिर या आवारात भरला होता, या आठवडी बाजारातून सात ते आठ जणांचे मोबाइल चोरीला गेल्याचे घटना घडले आहेत त्याबाबत नागरिकांनी पोलीस स्टेशन येथे धाव घेत मोबाईल चोरीला गेल्या बाबत तक्रार नोंद केली आहे. शिरवळ शहरात शुक्रवारी मोठा आठवडी बाजार भरतो. खरेदीसाठी बाजारपेठेत आलेल्या नागरिकांचे किमती मोबाइल आणि ऐवज लांबवण्याच्या, महिला बाबतीत असभ्य वर्तन करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढल्या आहेत. मात्र पोलीस प्रशासन नियंत्रणासाठी कठोर उपाययोजना करण्यात अपयशी ठरले आहेत.
बाजारातून नागरिकांचे मोबाइल चोरीला गेले असुन त्यापैकी बरेच जण तक्रार करण्यासाठी पोलिस ठाण्यात आले नाहीत, कारण तक्रार करुनही मोबाइल परत मिळण्याची शाश्वती नाही. बाजारात पोलिसांचे पेट्रोलिंग असूनही मोबाइल चोरट्यांना पकडण्यात अपयश येत आहे. शिरवळ शहर व परिसरात दुचाकी चोऱ्या व आठवडी बाजारात मोबाइल चोरट्यांचा वावर वाढला आहे.
मोबाइल चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी शिरवळ पोलिसांनी आठवडी बाजारादिवशी साध्या वेशातील पोलिसांची संख्या वाढवून आठवडी बाजारात ठिकठिकाणी पहारा देण्याची गरज असुन तसेच नागरिकांनीही मोबाइलसह आपल्या जवळील वस्तूंची काळजी घेण्यासाठी दक्ष रहाणे आवश्यक झाले आहे.