▲शिरवळ दि.2 – शिरवळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदिप जगताप यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अनेक अवैध धंद्यांमधे वाढ झाली असुन शिरवळ पोलीस ठाणे परिसरात अवैध धंदे व्यवसाय यांनी जोर धरला आहे. ३ जानेवारी रोजी नायगांव येथे पिडीत भगिनींने आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समोर पोलीस प्रशासनाचा विरोधात आपली व्यथा मांडली. त्यानंतर सातारा जिल्हा पोलिस अधिक्षक समीर शेख यांनी तात्काळ पिडीत कुटुंबाची व संबधित अधिकाऱ्यांची बैठक लावत अनेक मुद्यांवर चर्चा करण्यात आली.
यामध्ये शिरवळ परिसरात वाढत चाललेले दारु, मटका, गुटखा विक्री, गांजा विक्री, ऑनलाईन गेमिंग, देह विक्री यासारख्या सर्वच अवैध धंद्यांवर तातडीने कारवाई करा असे सातारा जिल्हा पोलिस अधिक्षक समीर शेख यांनी आदेश दिले होते. 48 तासात अनुपालन अहवाल वरीष्ठ कार्यालयाला पाठविण्याचे सांगण्यात आले होते परंतू दरम्यानच्या काळात शिरवळ परिसरातील एकही अवैध धंदा बंद न होता शिरवळ पोलिस स्टेशनचे संदिप जगताप यांनी “हाताची घडी अन् तोंडावर बोट” ठेवत पोलीस अधीक्षकांच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षदा लावल्याचे पहायला मिळाले आहे.
शिरवळ परिसरात अवैध व्यावसायिकांनी आपली अवैध धंद्याची उघड उघड कुंडलीच मारली असल्याने अवैध धंदे सुसाट चालत असल्याचे पहायला मिळाले आहे. त्यामुळे शिरवळ परिसरात अवैध गावठी दारु विक्री, मटका, जुगार, गुटखा विक्री, गांजा विक्री, ऑनलाईन गेमिंग, देह विक्री यासारख्या सर्वच प्रकारचे धंदे जोमात सुरु असून सातारा जिल्हा पोलिस अधिक्षक यांचे आदेशानंतर अवैध धंदेचालकांचे धाबे दणाणतिल असे वाटले होते परंतु याऊलट अवैध धंदे वाल्यांची चांदी तर गोर गरीब कुटुंबाची ससे होलफड पहायला मिळत आहे.
त्यामुळे शिरवळ पोलीस स्टेशन चे पोलीस निरिक्षक अवैध व्यावसायिकांना पाठबळ देत असल्याचे दिसुन येत असुन सर्वसामान्य जनतेचे संसार उद्वस्त झालेवरच कारवाही करणार की काय असा प्रश्र्न परिसरातील जनतेला पडला असून पोलीसांच्या या दुटप्पी कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.