क्राईमसातारा जिल्हा

♦️न्यायालयाचा न्यायाधीशच लाचलुचपतच्या जाळ्यात..


▲सातारा दि. 11 – सातारा जिल्हा सत्र न्यायालयात दाखल जामीन अर्जाबाबत मदत आणि जामीन करुन देण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच घेतानाचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह इतर तिघांविरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
          सातारा पोलिसाकडून मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणी पुणे येथील एका तरुणीने तक्रार दिलेली होती. त्यानुसार आनंद मोहन खरात (रा. खरातवस्ती, दहिवडी), किशोर संभाजी खरात (रा. वरळी मुंबई), जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय निकम आणि अनोळखी एकाच्या विरोधात गुन्हा नोंद झालेला आहे. सदर प्रकार ३, ९ तसेच १० डिसेंबर रोजी घडल्याचे पोलिसांनी सांगीतले.
           तक्रादार तरुणीच्या वडिलांचा जिल्हा सत्र न्यायालयात जामीन अर्ज आहे. यासाठी संशयित एक आणि दोन यांनी जिल्हा सत्र न्यायाधीश निकम यांच्यांशी संगनमत करून जामीन अर्जाबाबत मदत करणे, जामीन करुन देण्यासाठी न्यायाधीश निकम यांच्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केली. जामीनाबाबत पूर्वी ठरलेल्या एमएसईबी कोडमध्ये चर्चा करण्यात आली.
          तसेच १० डिसेंबर रोजी संशयित आनंद खरात, किशोर खरात आणि त्यांच्यासाेबत अनोळखी इसमाने तक्रारदार तरुणीकडे पाच लाख रुपये स्वीकारण्याची तयारी दाखवली होती. त्यानंतर पैसे गाडीत आणून द्या, असे सांगून लाच रक्कम मिळविण्याचा प्रयत्न केला असल्यामुळे तक्रार देण्यात आली असुन याबाबत सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page