देशसेवासंपादकीयसामाजिक

♦️महात्मा ज्योतिबा फुले स्मृतिदिन : स्त्री शिक्षणातून नवक्रांती आणि सामाजिक अभिसरण घडवून आणणाऱ्या ‘बहुजननायका’चा कार्यप्रवास..


संपादकीय दि.28 – महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरु करुन नवा इतिहास घडवला. त्यांनी शेतकऱ्यांचा आसूड, ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी हे ग्रंथ लिहून बहुजन समाजात नवचैतन्य फुलवलं. मुलींना शालेय शिक्षणाची गंगा खुली करुन महात्मा ज्योतिबा फुले हे आधुनिक भगिरथ बनले. मुलींची पहिली शाळा ते ‘शेतकऱ्यांचा आसूड’ हा ग्रंथ लिहून त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. मागासवर्गीय समाजघटकांसाठी शाळा सुरू करुन त्यांनी त्यांच्या जीवनात नवचैतन्य फुलवून जगण्याला बळ दिलं. छत्रपती शिवरायांची समाधी शोधून काढून त्यांनी शिवरायांवर पोवाडा लिहिला. त्यामुळे सामाजिक सुधारणांसह त्याला कृतीची जोड देणारा ‘महात्मा’ म्हणून ज्योतिबा फुले यांचं नाव आदरानं घेतलं जातं. आज महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृतिदिन..
महात्मा फुले यांचा जन्म :महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 ला गोविंदराव फुले आणि चिमणाबाई यांच्या पोटी झाला. गोऱ्हे हे त्यांचं मूळ आडनाव. मात्र त्यांचा फुलांच्या विक्रीचा व्यवसाय असल्यानं त्यांना सगळे ‘फुले’ या आडनावानंच ओळखत असल्यानं गोऱ्हे या आडनावाऐवजी फुले असं आडनाव प्रचलित झालं. देशात फुले, शाहू. आंबेडकर यांच्या विचारावर सामाजिक सुधारणा करण्यात येतात. महात्मा फुले यांच्यावर ‘द राईट्स ऑफ मॅन’ या ग्रंथासह थॉमस पेन या सुधारणावादी विचारवंताचा चांगलाच प्रभाव होता. त्यामुळेच महात्मा फुलेंनी जातीभेद खोटा असल्याचं ठामपणानं मांडलं. महात्मा फुले यांनी शिक्षणासह वस्ताद लहुजी साळवे यांच्याकडून दांडपट्टा आणि मल्लविद्येचंही शिक्षण घेतलं. महात्मा फुले यांनी कोणाची मुलाहिजा न बाळगता आपल्या सामाजिक कार्याचा यज्ञ धगधगता ठेवला.
महात्मा फुले यांचा विवाह :महात्मा ज्योतिराव फुले यांचा विवाह सावित्रीबाईंशी 1840 मध्ये झाला. सावित्रीबाई या सातारा जिल्ह्यातील नायगाव इथल्या खंडोजी नेवसे यांच्या कन्या होत्या. सावित्रीबाईंशी विवाह झाल्यानंतर या दाम्पत्यानं भारतीय इतिहासाला कलाटणी दिली. भारतीय समाजात स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नसल्यानं मुलींना शिकवण्यात येत नव्हतं. मुलींच्या शिक्षणाला देशात प्रचंड विरोध होता. मात्र सावित्रीबाईंना शिक्षणाची आवड होती. त्यामुळे महात्मा फुले यांनी सावित्रीबाईंना शिक्षित केलं.
मुलींची शाळा सुरू करुन झाले आधुनिक भगिरथ :देशात मुलींना शिक्षणाचा हक्क नाकारण्यात आला असल्यानं महात्मा फुले प्रचंड व्यथित होते. महात्मा फुले यांनी सावित्रीबाईंना सोबत घेऊन मुलींसाठी शाळा सुरू करण्याचं ठरवलं. मात्र त्यांना समाजासह त्यांच्या घरातूनही प्रचंड विरोध झाला. शिक्षणाला विरोध झाल्यानं महात्मा फुले यांनी घर सोडलं, मात्र आपलं काम सुरूच ठेवलं. फुले दाम्पत्यानं विरोध झुगारुन पुण्यातील भिडे वाड्यात 1848 ला मुलींची पहिली शाळा सुरू केली. मुलींसाठी शाळा सुरू केल्यानं त्यांच्यावर बहिष्कार टाकण्यात आला. महात्मा फुले यांनी समाजाचा विरोध झुगारुन रास्तापेठ आणि वेताळपेठेत 1851 ला पुन्हा मुलींसाठी दोन शाळा सुरू केल्या. त्यांच्या शिक्षणविषयक कार्यामुळे मेजर कँडी यांनी 1852 ला ब्रिटिश सरकारच्या वतीनं त्यांचा गौरव केला. त्या व्यतिरिक्त महात्मा फुले यांनी 1873 मध्ये ‘सत्यशोधक’ समाजाची स्थापना केली. शेतकऱ्यांचा आसूड ( 18 जुलै 1883 ) ब्राह्मणांचे कसब ( 1869 ) गुलामगिरी ( 1873 ) हे ग्रंथ लिहून त्यांनी समाजातील अनिष्ठ रुढींवर आसूड ओढला. छत्रपती शिवरायांची समाधी शोधून त्यांनी शिवरायांवर पोवाडा लिहिला. बहुजन समाजात नवचैतन्य फुलवणाऱ्या बहुजननायक महात्मा फुले यांचा आज स्मृतिदिन. त्यांच्या पावन स्मृतीस ‘सत्यशोधक न्यूज LIVE’ कडून विनम्र अभिवादन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page