▲वाई, दि.17 – काल वाई खंडाळा महाबळेश्वर मतदार संघात वाई येथे शरदचंद्र पवार महाविकास आघाडीची सभा पार पडली. पवार साहेबांनी विरोधी गटातील उमेदवार यांचा खरपूस समाचार घेतला. आबांना काय दिले नाही? गावच्या सरपंच की पासून बाजारसमिती ते ३ वेळा आमदारकी, जिल्हा बँकेचे अध्यक्षपद दिले पण त्यांनी सुद्धा तिचं ग**री दाखवली. कुठे काय दिसले की मलाच पाहिजे अशी वृत्त्ती… मी आज जबाबदारीने सांगतो “तात्या” असते तर त्यांनी हे कधीच होऊ दिले नसते, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवारांनी वाईच्या सभेत सभेत विद्यमान आमदार मकरंद आबा यांचा खरपूस शब्दात समाचार घेतला.
आबांनी लोकांचें मत काय ? त्यांचा खरा निर्णय काय ? हे जाणुन न घेता स्वार्थापोटी निर्णय घेतला. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे समाजकारण राजकारण उध्वस्त झाले. राज्यात महिलांवरील अत्याचार वाढत चालले आहे. महिला व मुली बेपत्ता होत आहेत. या प्रश्नावर कोणी बोलत नाही व हे सरकार गंभीर दिसत नाही. राज्यात फोडाफोडीचे राजकारण चालू आहे. मागील काळात राष्ट्रवादी पक्षाकडून बहुसंख्य लोक फुटून गेले. मला हा अनुभव काही नवा नाही. १९८० साली ५८ निवडून आले होते. मी काही कामानिमित्त १० दिवस परदेशात गेलो त्यावेळी माझ्याच पक्षातील ५२-५३ आमदार मला सोडून केले. शेवटी मी ५८ आमदारांचा विरोधी पक्ष नेता असणारा फक्त ३ आमदारांचा विरोधी नेता राहिलो. पुढील येणाऱ्या निवडणुकीत त्या ५२-५३ पैकी एकही आमदार निवडून आला नाही जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली.
या मतदारसंघात देखील असाच काही अनुभव येईल अस मला वाटले नव्हते. इथले जे सहकारी होते ते आमच्याशी अत्यंत प्रेमाने आणि निष्ठेने बोलत होते. मला आठवते मागे दोन वर्षांपूर्वी पक्ष फुटला आणि मी चव्हाण साहेबांच्या समाधीवर जाऊन आशिर्वाद घेऊन पुन्हा पक्ष बांधनीच्या कामाला सुरूवात करायचे ठरवले. त्यावेळी मी मुंबईहून चव्हाण साहेबांच्या समाधीकडे जात असताना सातारा जिल्ह्यात आल्यावर माझी गाडी थांबवली पाहिले तरमकरंद आबा होते. ते माझ्यासोबत गाडीत बसले, आम्ही चव्हाण साहेबांच्या समाधीचे दर्शन घेतले. मला वाटले हा गडी निष्ठेने सोबत असेल. पुन्हा बघतोय तर थोड्या दिवसांनी गडीच गायब! विचारणा केली तर कारखान्याचे दुखणे मांडले. मी म्हटले, कारखान्याचे दुखणे असेल तर त्यातून काय मार्ग काढायचा हे आपण ठरवू. सत्ता गेली म्हणजे सगळेच जाते असे नाही, हा रस्ता बरोबर नाही! तर तेम्हणाले आमचं ठरलंय..!
🔺आमचं ठरलंय……!
आता निवडणुकीत मकरंद आबा लोकांना सांगतात की साहेब आमच्या मनात आहेत. साहेब आजही आमचे श्रद्धास्थान आहे, दैवत आहे, आमचं डबल प्रेम आहे, त्यांची जागा हृदयात आहे, मनात आहे. मला हृदयात ठेवायला त्यांची जागा इतकी मोठी आहे का? साहेब आमच्या हृदयात बसतात, आम्ही निष्ठावान, साहेब छातीमध्ये, साहेब अंतकरणात; अरे किती ठिकाणी ठेवणार? कुठे कुठे बसू मी, बसायला आता जागा शिल्लक राहिली नाही. आणि तरीही सांगतात आमच ठरलंय.. आमचं ठरलंय हे खर आणि ठरलं काय ज्या दिवशी मतदानाचा अधिकार बजवायच्या दिवशी त्या दिवशी अरुणादेवींना प्रचंड बहुमताने विजयी करणार.. असे म्हणाले.
🔺 गद्दारांना पाडा..पाडा..पाडा..!
भाषणाच्या समारोपावेळी साहेबांना एका कार्यकर्त्याची चिठ्ठी आली त्या चिट्टीत लिहिलेलं साहेबांनी वाचून दाखवलं.. त्यात लिहिलं होतं तुम्ही बोलाल त्या ठिकाणी आम्ही जाणार परंतु गद्दारांचं काय? साहेबांनी उत्तर दिलं जो कोणी गद्दार असेल त्याला पाडा..पाडा..पाडा..! असा आदेश साहेबांनी सभेतील उपस्थित संपूर्ण जनतेला दिला त्यावेळी कार्यकर्त्यांमध्ये एकच जल्लोष पाहायला मिळाला.