▲शिरवळ, खंडाळा दि.1 – धनगरवाडी ता. खंडाळा जि. सातारा गावच्या हद्दीत बेकायदेशीर चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर सातारा जिल्हा पोलीस दलाने छापा टाकून मोठी धडक कारवाई करतं १ कोटी ९ लाख २० हजार ३० रुपये किमतीचा मुद्देमालासह जुगार साहित्य हस्तगत केला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की.
विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र, सुनिल फुलारी यांनी विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने कोल्हापूर परिक्षेत्रातील सर्व घटकांना अवैध धंदे, अवैध शस्त्रे, अंमली पदार्थ, अवैध दारु विक्री, वाहतूक इत्यादींवर सक्त कारवाई करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा यांनी दिलेल्या आदेशानूसार सातारा जिल्हयातील स्थनिक गुन्हे शाखा सातारा पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार दि.३१ रोजी पोलीस अधीक्षक सातारा यांना गोपनिय बातमीदारामार्फत तीन पानी पत्त्याचा जुगाराचा तसेच दारुचा अड्डा धनगरवाडी येथे डॉ. जगताप हॉस्पिटल पाठीमागे एका पोल्ट्री फार्म शेडमध्ये चालू असल्याची माहिती प्राप्त झाली.
यावर सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर, समीर शेख,पोलीस अधीक्षक सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी स्वतः तसेच भुईंज पोलीस ठाणे व शिरवळ पोलीस ठाण्याकडील अधिकारी व अंमलदार यांच्या मदतीने या ठिकाणी छापा टाकला असता तेथे एकूण ४३ जण जुगार खेळत असल्याचे आढळुन आल्याने त्यांना ताब्यात घेवून यांच्याकडून रोख रक्कम सह जुगार साहित्य, विदेशी दारु, बिअर, मोबाईल हॅन्डसेट तसेच ६ चारचाकी वाहने व १४ दुचाकी वाहने असा एकूण १ कोटी ९ लाख २० हजार ३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर कारवाही समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली शिरवळ पोलीस निरीक्षक संदिप जगताप, भुईंज सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, पोलीस अंमलदार व शिरवळ पोलीस ठाणे व भुईंज पोलीस ठाणेकडील पोलीस अंमलदार यांनी सदरची कारवाई केली.
• शिरवळ पोलिसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष ?
शिरवळ पोलीस स्टेशन हद्दीत सुरु असणाऱ्या या जुगार अड्यावर पुणे-सातारा जिल्ह्यातील अनेकजन मोठ्या प्रमाणात जुगार खेळण्यासाठी येत असल्याचे बोलले जात आहे. असे जुगार अड्डे पोलिसांकडून कारवाई केल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात जुगार बंद होतात मात्र पुन्हा धंदे जैसे ते चालू होत असल्याचे जनतेमधून बोलले जात आहे. यापुर्वीच शिरवळ नजिक शिंदेवाडी येथे चालु असणारा जुगार अड्डा काही दिवसापूर्वीच बंद झाला होता. त्यानतंर धनगरवाडी नजीक चालु असणाऱ्या जुगार अड्यावर सभोवतालचे जुगार खेळणारे येत होते. यामुळे शिरवळसह खंडाळा तालुक्यातील तरून पिढीसह संसारिक कुटुंबियांना भरकटविण्याचे काम यामुळे होत असून यात कुटुंबाची वाताहात होऊन, अनेक कुटुंब रस्त्यावर आली आहेत. बरेच वेळा स्थानीक नागरिकांकडून याबाबत 112 ला कॉल करून कल्पना दिली असता स्थानिक पोलीस प्रशासनाने डोळेझाक करीत पोलिसांकडूनच गांधारीची भूमिका घेतली जात असल्याने या चालू असणाऱ्या प्रकाराबाबत नागरीक त्रस्त झाले आहेत. शिरवळ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अनेक ठिकाणी अवैध धंद्याचे जाळे पसरलेले असून, शिरवळ पोलीस याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने अवैध धंदे मनमुराद पणे चालू असुन पोलिसांच्या अभय वरदनाने परिसरातील अवैध धंदे जोमाने सुरु असल्याचे नागरीकांन कडून बोलले जात आहे.
• शिरवळ पोलीस प्रशासन मात्र वसुलीत मग्न ?
सातारा पोलिसांनी मध्यरात्रीच्या सुमारास एवढी मोठी कारवाई केली. मात्र हा जुगार अड्डा बरेच दिवसांपासून उघड उघड सुरु असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. पोलिसांची शिरवळ पोलीस स्टेशन हद्दीत पोलीस स्टेशनच्या काही अंतरावरच अजूनही वेगवेगळया भागात अवैध धंदे, अवैध वाहतूक, ऑनलाईन जुगार जोमात सूरू असून त्यावरही कधी आळा बसणार की फक्त शिरवळ पोलीस प्रशासन मनमुराद च्या साहाय्याने अवैध धंद्यांना “काय देशिल” वसुलीवर लक्ष राहणार असा प्रश्न परिसरातील नागरिकांना पडला आहे.