♦️लाडकी बहीण योजनेचा निधी सरकारनं थांबवला, नवे अर्जही स्वीकारणं बंद; नेमकं कारण काय?
▲खंडाळा दि.19 – आचारसंहितेच्या काळात मतदारांवर थेट प्रभाव टाकणाऱ्या आर्थिक योजना बंद कराव्यात अशा सूचना निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिल्या आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यातील महायुती सरकारला तारणहार ठरणारी ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजना राज्य सरकारने थांबवली आहे. चार दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने आर्थिक लाभ देणाऱ्या योजना थांबण्याची नोटीस काढली होती. यानंतर आता राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाने मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना तुर्तास बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यातील महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजना सुरू केली असून प्रति महिना दीड हजार रूपये महिलांना थेट खात्यावर दिले जातात. पण होऊ घातलेल्या दिवाळीच्या तोंडावर आता योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आर्थिक लाभ देऊन मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या योजना ताबडतोब थांबण्याचे आदेश मुख्य निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिले होते. यामुळे आता बहुचर्चित लाडकी बहीण योजना थांबवण्यात आली असून नवीन अर्ज भरणे देखील बंद केल आहे.
सध्या राज्यात विधानसभा निवडणुकींची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. यादरम्यान मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी राज्य शासनाच्या सर्व विभागांकडे आर्थिक लाभ देणाऱ्या कोणत्या योजना आहेत? याची माहिती मागवली होती. यावेळी महिला व बालकल्याण विभागाची ‘लाडकी बहिण’ योजना मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ देत असल्याचे निदर्शनास आले होते. यानंतर ही योजना विभागाला तुर्तास थांबविण्याचा आदेश देण्यात आले होते. याप्रमाणे ही योजना तुर्तास थांबविण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.
• बातमी व जाहिरातीसाठी संपर्क – किरण मोरे.