मनोरंजनसंपादकीयसामाजिक

♦️“बाई वाड्यावर या.. आणि कडूच बियान..” व्यथा.. आणी DJ च्या तालावर बेधुंद नाचणारी तरुण पिढी..


संपादकीय दि.१४ – पूर्वी खेड्यात बाई ठेवणे हा प्रकार चालायचा. म्हणजे तिला सोप्या भाषेत “रखेल” म्हंटले जाई. यात जास्त करून नाचगाणे करणाऱ्या नायकिणी असत. त्याकाळी नाचगाणे करणाऱ्याना साधे पोटही भरता येत न्हवते. आणि त्यातच या बायकांचा जन्म अठरा विश्व दारिद्र्यातला असे. आई बाप जन्म देऊन कुठेतरी कायमचे परागंदा झालेले असत. मग त्यांना भुरळ पाडून फसविले जाई. आणि त्याही पोट भरण्याच्या आशेने अशा लोकांकडे आयुष्यभर रखेल म्हणून रहात.

मग रंगेल असणारी लोकं आपल्या चिरेबंद वाड्यातल्या भक्कम भिंतीच्या आत या बायकांना आयुष्यभर भोगायला ठेवायचे. अशा भल्या मोठ्या तीस चाळीस खणी वाड्यात दर्शनी कडेपाट असलेला सोपा असे. खुंटीवर तलवारी, बंदुका टांगलेल्या असत. खाली भली मोठी जाजमं, गादी, गालिचे आणे तक्के असत. काही श्रीमंत लोक वाड्यात अत्तराचे दिवे जाळून अशा नायकिणी रातभर नाचवायचे. जणू “अत्तराचा फाया मला आणा राया” असेच स्वर भल्या मोठ्या तीस चाळीस खणी वाड्यातून घुमत राहायचे. डोक्यावर दिवस रात्र पदर घेवून राहणाऱ्या त्यांच्या हक्काच्या बायका पुरुषांना सहसा विरोध करत नसत. केला तरी तो कोणाच्या पचनी पडत नसे. कारण घरात पुरुषाचा धाक असे. बऱ्याच ठिकाणी या ठेवलेल्या बाईला मुलं होवू दिली जात नसत. कारण ती इस्टेटीत वाटा मागतील ही भीती त्यामागे असे. आणि चुकून बाई कधी गरोदर राहिलीच. तर त्यांना ठराविक वनस्पतीचा काढा पाजण्यात येई. व प्रचंड वेदना झेलून या बाईला रिकामी केली जात असे. असले अघोरी उपचार करूनसुद्धा एखांदी बाई गरोदर राहिलीच. तर तिच्या मुलाच्या जन्मांतर काही वेळातच वाड्यात अथवा वाड्याच्या मागच्या बाजूला परूसभर खोल खड्डा खोदून ती मुलं जिवंतपणी गाडली जात. पण वाड्याबाहेरच्य माणसाला याची काहीच खबरबात मिळत नसे. कारण ठेवलेली बाई कधी कोणाच्या नजरेसही पडत नसे. काहीजण तर तिला माडीवरच घमेल्यात आंघोळ करायला लावून भरलेलं पाण्याचं घमेलं वाड्याच्या बाहेर आणून स्वत: ओतायचे. म्हणजे काही रंगेल माणसं तर तरुणपणी जे बाईला वाड्यात कोंबायचे. ते तिचं मेल्यानंतर मढेच बाहेर काढायचे. वाड्यातला वारा आणि अंधार पिवून सारा जन्म चिरेबंद भिंतीच्या आत घालविलेली बाई धान्य साठवायच्या कणगीसारखी फुगलेली असायची. तिला उचलायला तितकीच धिप्पाड देहाची माणसं लागायची. इतके करूनही तिच्या पोटी आलेलं एखांदे मुल जगलच तर त्याला मोठे झाल्यावर “कडू बियाणे” म्हणून संबोधले जाई. मग अशा मुलाला एखादा जमिनीचा तुकडा कसायला दिला जाई.

माझ्या ऒळखीतली आज्जी एका रखेल बाईच्या पोटाला जन्मलेल्या माणसाचे नाव घेवून सांगायची की, “तो जन्मला तेव्हा त्याला वाड्यात खोदलेल्या खड्ड्यात पुरताना ते चिमुकलं बापाकडे बघून ओठातून हसलं. मग बापानं क्षणभर विचार केला अन दया येऊन खड्यात टाकलेल्या त्या जीवाला वर काढून वाढविला.” पुढे मोठे झाल्यावर त्याला “कडू बियाणे” म्हणून साऱ्या पंचक्रोषित ओळख मिळाली.

त्यामुळे अशा ठेवलेल्या बाईचा वापर फक्त जन्मभर भोगण्यासाठीच केला जाई. सालभरात एखाद्या जत्रेत बाईच्या अंगावर नवं लुगडं, चोळी चढायची. त्यावरच ती समाधान मानायची. आणि आपला जन्म भोगण्यासाठीच झाला आहे अशी मनाची तयारी करून ती बाई आलेला दिवस ढकलत राहायची.

बाकी, “बाई वाड्यावर या” अशी गाणी म्हणून DJ च्या तालावर समोर बेधुंद नाचणाऱ्या आताच्या तरुण पिढीला बाईचं हे अवघड जागेचं दुखणं कधी समजणारच नाही..

• सदर लेखातून कोणाच्या भावना दुखावण्याचा उद्देश नसून त्याचा कोणीही स्वतःशी हितसंबंध लाऊ नये..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page