♦️माणसातील माणूस जागा करणारे विश्वचैतन्य नारायण महाराज अनंतात विलीन..
▲ पुरंदर, दि.10-श्री क्षेत्र नारायणपूर येथील विश्वचैतन्य सदगुरू नारायण महाराज यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. नारायण महाराज हे वयाने 84 वर्षांचे होते. संपूर्ण भारतात त्यांनी चार दिशेस चार दत्तधाम बांधण्याचा संकल्प केला होता तो त्यांना अखेरीस पूर्ण केला. त्यापैकी एक असणारे श्री क्षेत्र नारायणपूर आहे. नारायणपूर येथे बहुसंख्य भावीक दर गुरुवारी व पौर्णिमेस गर्दी करत, महाराज नेहमीच विविध समाजकार्यात अग्रेसर होते. त्यांनी सामुदायिक विवाह सोहळ्याला सातत्याने प्रोत्साहन दिले होते या संकल्पनेतून मोठ्या प्रमाणात त्यांनी सामूहिक विवाह सोहळे पार पाडले. खेडोपाडयातील गावागावात आपल्या शिष्यांच्या माध्यमातून त्यांनी व्यसनमुक्ती चळवळ सुरू केली. आणि ती चळवळ आज देखील चालु आहे.
राज्यात व राज्याबाहेर त्यांचा मोठा भाविक वर्ग आहे. त्यांच्याकडे राजकीय क्षेत्रापासून ते सर्वसामान्य लोकांपर्यंतचे भक्तगण होते. नारायण महाराज व भाविकांमध्ये जिव्हाळ्याचे नाते होते. विविध समाजकार्यात ते नेहमी अग्रेसर असत.
भक्तगण व शिष्य यांना अंतिम दर्शन घेण्याकरिता नारायण महाराज यांचे पार्थिव मंगळवारी (ता. 10) सकाळी 8 ते दुपारी 3 वाजेपर्यंत श्री क्षेत्र नारायणपूर मंदिर येथे ठेवण्यात येणार आहे. सायंकाळी 4 वाजता त्यांच्या पार्थिवावर यज्ञकुंडा जवळ अंत्यसंस्कार विधी पार पडणारआहे.