♦️ “पप्पा मला खूप भीती वाटते..” मुलीने चिट्टी लिहून सांगितला प्रकार.. मुलं आणि पालक यामध्ये पडत आहे अंतर..
▲ संपादकीय दि.2 – नुकतीच शिरवळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या मुलीचा विनयभंग झाल्याची तक्रार तिच्या वडिलांनी दाखल केली परंतु या घटनेत त्या मुलीने घडलेला प्रकार वडिलांना न सांगता ऐका हेल्पलाईन नंबर वर सांगून नंतर चिट्टीच्या माध्यमातून आपल्या वडिलांना सांगितला हि बाब अत्यंत धक्कादायक असून मुलं व पालक यामध्ये अंतर तर पडत नाहीना याचा आभास होत आहे.
किशोवयीन मुला-मुलींमध्ये मानसिकतेमध्ये हळूहळू बदल होत आहेत. पालक आणि मुलं यामध्ये अंतर पडत आहे. किशोरवयीन मुले-पालक यांच्यातील दरी ही मुलांच्या वाढत्या वयाबरोबर बरेचदा वाढतच जात आहे. त्यामुळे किशोरवयीन मुलांना समजून घेत या नात्यातील दरी कमी करण्याचा प्रयत्न व्हायला हवा.
• पालक ही परिस्थिती कशी हाताळतात यावर बरेच अवलंबून आहे?
• मुलांबरोबर विश्वासाचे नाते निर्माण करा – पालकांसाठी प्रतिकात्मकपणे असे म्हटले जाते की जेव्हा आई-वडिलांचा जोडा मुला-मुलीच्या पायात येऊ लागतो तेव्हा त्याच्याशी मित्रासारखे वागणे सुरू केले पाहिजे. मुलांशी संभाषणात इतर गोष्टी कमी बोला, त्यांचे जास्त ऐका, त्याला समजून घ्या, विश्वास निर्माण करा.
• मुलांना प्रायव्हसी राखू द्या – शक्य असल्यास, मुलांच्या प्रायव्हसीच्या गरजा पूर्ण करा. त्यांचेशी मैत्रीची भावना निर्माण करा. पालकांनी मुलांशी लैंगिकते विषयी निसंकोच बोला, समज द्या. त्यामुळे ते आपणास सर्व पर्सनल गोष्टी नीसंकोच सांगू शकतील. एखादी गोष्ट शक्य नसेल, अयोग्य असेल तर शांतपणे त्याची कारणे समजावून सांगा.
• तुमच्या अपेक्षा चांगल्या पद्धतीने मुलांसोबत शेअर करा – जेव्हा मुलांना तुमची कौटुंबिक मूल्ये-नियम, परस्थिती आणि ते जोडण्याचे परिणाम कळतात तेव्हा ते चांगले नातेसंबंध निर्माण करण्यास उत्सुक असतात. म्हणूनच हे तुमच्या मुलांसोबत शेअर करा की पालक म्हणून तुमच्या मुलांकडून काय आणि कोणत्या अपेक्षा आहेत हे त्यांना प्रेमाने समजाऊन सांगा.
• त्यांच्या कृतींचे कौतुक करा, त्यांच्या निवडी स्वीकारा – जेव्हा ते काही चांगले करतात तेव्हा त्यांच्या कृतींचे कौतुक करा. मुलाच्या सर्व आवडी-निवडी चुकीच्या असतीलच असे नाही, तुमच्या अनुभवानुसार त्यांची चाचणी घ्या आणि बरोबर आढळल्यास त्यांना त्याचे श्रेयही जरुर द्या. आणि चुकीच्या गोष्टी आढळल्या तर जवळ घेऊन प्रेमाने समजाऊन सांगा.
किशोरवयीन मुलांशी कायमच स्पष्ट संवाद असणे आवश्यक आहे. जर संवाद नसेल तर मुलांमध्ये अतिशय गोंधळ पाहायला मिळतो. पालक आणि मुलांच्या नात्यात एक सीमारेषा टिकवणे महत्त्वाचे आहे. त्यांच्यासमोर आपल्या भावना व्यक्त करणे, सहानुभूतीने वागणे त्यांना आयुष्यात पुढे जाण्यासाठी मदत करणे या सर्व गोष्टी पालक आपल्या मुलांबरोबर करणे अतिशय महत्वाचे आहे. पालकत्व हा प्रवास अतिशय सुंदर असून तसेच तो सुखावणारा देखील आहे. नक्कीच या सर्व गोष्टीमुळे पालक व किशोरवयीन मुले यामधील अंतर कमी होण्यास मदत होईल.
• बातमी व जाहिरातींसाठी संपर्क – 9011555123